मुंबई, २८ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या पुढाकारातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा विशेष उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत ३६ जिल्ह्यांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आहे.
या उपक्रमात गणेश मंडळांचेही मोठ्या प्रमाणात योगदान आहे. मंडपांमध्ये किंवा त्यांच्या आसपास आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात असून, हजारो भाविक आणि स्थानिक नागरिक याचा लाभ घेत आहेत.या शिबिरांद्वारे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान होऊन गरजूंना पुढील मोफत उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणार आहेत. तपासणीच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही दिली जात आहे.शिबिरांची माहिती पोहोचवण्यासाठी गणेश मंडळांकडून मागील आठवड्यापासून बॅनर, पत्रके, सोशल मीडियाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. परिणामी, अनेक नागरिक तपासणीसाठी पुढे येत असून, यामुळे आरोग्याबाबत जनजागृती वाढत आहे. या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले,
“‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम हा केवळ तपासणीपुरता मर्यादित नसून, तो लोकांमध्ये आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणारा आहे. गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा हा प्रयत्न म्हणजे जनहिताचा उत्तम आदर्श ठरतो.”