प्रमोद देठे – दहिसर टोल नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याच्या शिंदे गटाच्या घोषणेला आता वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट विरोध केला आहे. वर्सोवा परिसरातील जागा ही वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट करत, “या जागी कोणतेही टोल काम होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका नाईक यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट यांच्यातील अंतर्गत वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाका हलवून वर्सोवा येथे स्थलांतरित केला जाणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही काम सुरू असल्याचा दावा केला होता. मात्र, ही जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असून ती वन खात्याच्या अखत्यारीत येते, असे स्पष्ट करत नाईक यांनी त्या जागेवर कोणतेही बांधकाम होऊ देणार नसल्याचे सांगितले.
नुकत्याच वाशी येथे झालेल्या जनता दरबारात भूमिपुत्र संघटनेच्या वतीने सुशांत पाटील यांनी वर्सोवा येथील टोल नाक्याच्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की,
“वर्सोवा येथील रस्ता अरुंद असून ती जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येते. त्यामुळे त्या ठिकाणी टोल नाका उभारण्यास वन विभाग परवानगी देणार नाही.”
या वक्तव्यामुळे भाजप व शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एका बाजूने टोल नाका हलवण्याच्या घोषणा केल्या जात असताना, दुसऱ्या बाजूने त्याच सरकारमधील मंत्री त्या जागेला विरोध करत आहेत. परिणामी, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, टोल नाका स्थलांतराच्या प्रस्तावाची कायदेशीरता आणि व्यावहारिकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दररोज हजारो मुंबईकर दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत आहेत. टोलमुक्त मुंबईसाठी घोषणांचा पाऊस पडतो, मात्र प्रत्यक्षात निर्णय मात्र कधीच अंमलात येत नाहीत, अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.