मुंबई, ठाण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर; जानेवारीत मतदार ठरवणार सत्ताधीश
मुंबई : राज्यातील रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्य निवडणूक आयोगाने आज २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी, तर २ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. ३ जानेवारीला अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
राज्यातील २९ पैकी २७ महापालिकांची मुदत आधीच संपलेली असून, काही महापालिकांची मुदत २०२०, २०२२ आणि २०२३ मध्ये संपली होती. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक जाहीर होताच २९ महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दुबार मतदारांना रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर विशेष चिन्ह देण्यात आले असून, त्यांच्या घरी सर्वेक्षण करून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याची नोंद घेण्यात आली आहे. संबंधित मतदाराला त्या एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
या निवडणुकांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या सत्तासमीकरणांची उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.