डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १४० कोटी भारतीयांची भूमिका मांडली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदार डॉ. शिंदे यांचे कौतुक

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १४० कोटी भारतीयांची भूमिका मांडली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदार डॉ. शिंदे यांचे कौतुक

युवा नेतृत्वाला संधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

 

मुंबई :परदेशात खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात १४० कोटी भारतीयांची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर समर्थपणे मांडली. एक वडील म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. तब्बल दोन आठवड्यांच्या परदेश दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे बुधवारी रात्री मुंबईतील मुक्तागिरी निवासस्थानी परतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज मायदेशी परतले. चार देशांच्या दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे यांना १४० कोटी भारतीयांची भूमिका मांडण्याची संधी मिळाली. ही भूमिका खासदार डॉ. शिंदे यांनी समर्थपणे बजावली, त्याचा अभिमान वाटतो, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेडिकल प्रॅक्टिसऐवजी डॉ. श्रीकांतला राजकारणासारख्या वेगळ्या क्षेत्रात आणले का, असा आपला समज झाला होता, मात्र आज खऱ्या अर्थाने खासदार डॉ. शिंदे यांनी हा निर्णय योग्य ठरवला. खासदार डॉ. शिंदे यांनी या दौऱ्यात केवळ भारताची बाजू उत्कृष्टपणे मांडली नाही तर चारही देशांचा भारताच्या बाजूने पाठिंबा मिळवला, हे बघून कोणाचेही उर अभिमानाने भरुन येईल, अशीच आपली अवस्था असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या शिष्टमंडळात अहलुवालियांसारखे ज्येष्ठ नेते होते. तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याबरोबरच ज्येष्ठांना मार्गदर्शनासाठी सोबत पाठवणे यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यापक दृष्टीकोन दिसून आला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, एनडीए बैठकीत ऑपरेशन सिंदूरचा प्रस्ताव मांडण्याची आपल्याला संधी दिली तर डॉ. श्रीकांत शिंदे या युवा खासदार विश्वास ठेवून त्याला शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दहशतवादाविरोधात भारताची भूमिका आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भात जगभरातील जवळपास ३४ देशांमध्ये खासदारांची विविध शिष्टमंडळे गेली होती. पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर दिले. निरपराध नागरिकांना न मारता दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि पंतप्रधान मोदी यांनी युद्धनिती दाखवून दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराचे शौर्य दिसून आले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य हीच भूमिका भारताची आहे. ही भूमिका जगाला पटवून देण्याचे काम खासदारांच्या शिष्टमंडळाने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *