महिलांच्या सक्षमीकरणासाठी घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप; शिवसेना मुंबादेवी विधानसभेचा उपक्रम; १४३ महिलांना उद्योगासाठी मदत

मुंबई – ( प्रमोद देठे) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिवसेना मुंबादेवी विधानसभा विभागातर्फे घरघंटी व शिलाई मशीन वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात एकूण १४३ महिलांना मोफत यंत्रांचे वाटप करण्यात आले असून, महिलांनी घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, हा यामागचा उद्देश आहे.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. समाजसेवक रुपेश रमेश पाटील यांची शिवसेना मुंबादेवी विधानसभा विभागप्रमुख पदी निवड झाल्यानंतर, यंग उमरखाडी क्रीडा मंडळ आणि आपला रुपेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सना कम्युनिटी हॉल, चिंचबंदर, डोंगरी येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, शिवसेना उपनेत्या आशा मामेडी, माजी विभागप्रमुख दिलीप नाईक, मुंबादेवी महिला विभाग प्रमुख रेखा सुरणकर, तसेच महिला उपविभाग प्रमुख सौ. प्रिया रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात लाभार्थी महिलांनी आपले अनुभव सांगितले आणि या उपक्रमामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला. शिलाई व घरघंटी मशीनमुळे महिलांना घरूनच रोजगाराची संधी मिळणार असून, त्यातून त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य व सामाजिक स्थान बळकट होईल.
या उपक्रमात स्थानिक रहिवासी, सामाजिक संस्था व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी शिवसेना मुंबादेवी विधानसभा विभागप्रमुख रुपेश पाटील यांनी सांगितले की,”ही केवळ सुरुवात आहे. लवकरच महिला उद्योजकांसाठी कौशल्य विकास शिबिरे, प्रशिक्षण वर्ग आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.”
उपक्रमास विशेष मार्गदर्शन व सहकार्य याबद्दल मान्यवरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हा उपक्रम म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक सकारात्मक पाऊल असून, समाजातील महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी अशा योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *