■ प्रतिनिधी, भाईंदर : भारताचे संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, भाईंदर पश्चिम येथील फाटक रोड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस प्रमोद देठे यांनी वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज, सामाजिक संस्था आणि राजकीय कार्यकर्ते पुतळा परिसरात एकत्र येऊन अभिवादन करतात. मात्र, पुतळ्याच्या आसपास नो-पार्किंग असतानाही बेकायदेशीररित्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे आणि अवैध गॅरेजमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी:
प्रमोद देठे यांनी १३ व १४ एप्रिल रोजी पुतळा परिसर ‘पार्किंग मुक्त’ करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी केली आहे. त्याचबरोबर सकाळी व संध्याकाळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, किंवा दिवसभर गस्त ठेवून अवैध पार्किंगवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी निवेदनात केली आहे.
याशिवाय, पुतळा परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी वाहतुकीची अडथळा होणार नाही, याची दक्षता घेऊन योग्य त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस प्रमोद देठे यांच्या पत्राची वाहतूक विभागाणे दखल घेत आज वाहतूक पोलिसांनी लाउडस्पीकर द्वारे अवैध पार्किंग हटविण्यास सांगून तात्काळ कारवाई करत सदर परिसर अवैध पार्किंग मुक्त केला. पहिल्यांदाच एवढ्या वर्षात सदर परिसर पार्किंग मुक्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उद्या भारताचे संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या नागरिकांना आता अवैध पार्किंगमुळे नाहक त्रास सहन करावा लागणार नाही असा विश्वास देठे यांनी व्यक्त केला.