डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाईंदर पश्चिम येथे स्वच्छता व मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी

■ प्रतिनिधी, भाईंदर –  १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरात शासकीय परिपत्रकानुसार सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. राधाबिनोद शर्मा आयुक्त तथा प्रशासक यांच्या शुभहस्ते व मा.अति. आयुक्त (सा.प्र), मा.अति. आयुक्त (कर), उपायुक्त (सर्व), शहर अभियंता, नगरसचिव, अधिकारी/कर्मचारी वर्ग व पत्रकार यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सकाळी  एम.टी.एन.एल. भाईंदर (प.) समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथे संपन्न होणार आहे.


भाईंदर पश्चिमेच्या फाटक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता आणि विविध मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्च्याचे सरचिटणीस प्रमोद देठे यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे केली आहे.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विविध राजकीय, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या पुतळा परिसरात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन पाण्याची सुविधा, उन्हापासून बचावासाठी सावलीच्या व्यवस्था कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

तसेच, पुतळा परिसराच्या दोन्ही बाजूंना बेकायदेशीर वाहन पार्किंग व गॅरेजमुळे दरवर्षी मिरवणूक आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेता १४ एप्रिल रोजी पार्किंग हटवून त्या ठिकाणी नो-पार्किंगचे फलक १३ व १४ एप्रिल दरम्यान लावावेत, अशीही मागणी केली आहे. शिवाय, परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, असेही सुचवले आहे.

पुतळा परिसरालगत मार्बल वर कार्पेट टाकण्याची मागणी देठे यांनी केली आहे कारण उन्हामुळे अभिवादन करण्सायाठी येणाऱ्या नागरिकांना चटके बसत असल्याचे गेल्या वर्षी निर्दशनास आले होते. सध्या चालू असलेले रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून, त्या ठिकाणी पडलेल्या दगडांमुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ परिसर मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे,” असे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्च्याचे सरचिटणीस प्रमोद देठे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *