नवी मुंबई – ईद-ए-मिलाद (मिलाद उन-नबी) या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र सणाच्या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर करण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी तसेच विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
५ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलाद साजरा केला जाणार असून, या दिवशी मुस्लिम समाज पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष नमाज, धार्मिक कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभांचे आयोजन करतो. या पवित्र दिवशी मद्यविक्री सुरू राहिल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका हाजी शाहनवाझ खान यांनी मांडली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, बिअर बार, वाईन शॉप्स व तत्सम दुकाने बंद ठेवावीत, जेणेकरून कोणीही दारूच्या नशेत गैरवर्तन करू नये किंवा धार्मिक कार्यक्रमांत विघ्न निर्माण होऊ नये.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ५ सप्टेंबर रोजी ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करावा, अशी आग्रही मागणी एमआयएमकडून करण्यात आली आहे