पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. नियमित विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
तसेच पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विद्यार्थ्यांसाठी (ट्रान्सफर ऑफ क्रेडिट योजनेअंतर्गत) अर्ज सादर करण्याचीही हीच अंतिम तारीख राहणार आहे.
हे सर्व अर्ज संबंधित शाळा प्रमुखांमार्फत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर — www.mahahsscboard.in — ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह दिलेल्या या मुदतीनंतर पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
मंडळाने शाळांना सूचना दिल्या असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत भरून मंडळाकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे.