पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. २३ : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती राज्यभर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक, पुणे आणि नागपूर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या त्रिशताब्दी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा गौरव करण्यासाठी उत्तम संधी आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या हा कार्यक्रम मंत्री ॲड. शेलार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

नागपूरमध्ये २५ मे, २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोवाडे, संगीत, नाट्य आणि इतर कलाविष्कार सादर केले जाणार आहेत.

नाशिक येथे २७ आणि २८ मे, २०२५ रोजी ‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’ या नावाने दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आणि नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. तसेच २८ मे, २०२५ रोजी ‘राजयोगिनी अहिल्यादेवी’ या ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता सुरू होतील.

पुणे येथील कार्यक्रम ३१ मे, २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. येथे शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळ, भारूड, वासुदेव आणि पुण्यश्र्लोक महानाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा सोहळा रसिकांच्या मनात ठसा उमटवणार आहे.

तीनही जिल्ह्यात होणारे हे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *