सहकार चळवळीतून इमारत उभारणाऱ्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार-सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान पुढे नेण्यासाठी आशिष शेलारांनी पुढाकार घ्यावा
भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची विनंती
मुंबई- मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आ. आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केली आहे.
मुलुंड (पूर्व) येथील आर्यावर्त इंद्रप्रस्थ को. ऑप. सोसायटीतील रहिवाशांनी कोणत्याही बँकेचे आर्थिक पाठबळ न घेता स्वयंपुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारत उभी केली आहे. या इमारतीतील रहिवाशांना आज सांस्कृतिक कार्यमंत्री आ. आशिष शेलार आणि भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत चावी वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी खा. विकास महात्मे, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी, सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे, सचिव विशाल मारकड, खजिनदार रत्नाकर वरळीकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधताना आ. आशिष शेलार म्हणाले कि, आज तुमच्याकडून आम्ही शिकायला आलोय. हे सगळं शिक्षण पुढे प्रचारीत, प्रसारित करणं म्हणजे घरांची चळवळ आणि ती मराठी माणसांच्या घरांची चळवळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी माणसाच्या घराची, कुटुंबाची चिंता असते म्हणून ते शासन निर्णय काढतात.
शेलार पुढे म्हणाले कि, मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार आहे. तसेच तुमच्या ज्या काही नवीन सूचना आल्या आहेत त्या शंभर टक्के नवीन अध्यादेशात घालू. पण ही चळवळ वृद्धिंगत होवो. तुमचे कार्य अनेकांना प्रेरणा देईल, असेही आ. शेलार यांनी म्हटले.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, मुंबईत स्वयंपुनर्विकास व्हावा हा माझा अट्टाहास होता. गेली १५ वर्ष मी यावर काम करतोय. मुंबईत मध्यमवर्गीय सर्वसामान्य मराठी माणसासाठी स्वयंपुनर्विकास हा दिशादर्शक आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच स्वयंपुनर्विकास गतीने होताना दिसतोय. मुंबई जिल्हा बँकेकडे १६०० प्रस्ताव आलेत. त्यातील ३६ प्रकल्पाना कर्जमंजुर केले असून १४ इमारतींमध्ये लोकं राहायला गेली आहेत. पुढील आठवड्यात चारकोप येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्री यांना घेऊन जाणार आहे. गोरेगाव येथील गृहनिर्माण परिषदेत स्वयंपुनर्विकासासाठी १८ मागण्या केल्या होत्या त्यापैकी १६ शासन निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी काढण्यास सांगितले. आता राज्य सहकारी बँक स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी रूपये आणि एनसीडीसीकडून एक हजार कोटी मुंबई बँकेला मिळणार आहेत. त्यातून मुंबईतील स्वयंपुनर्विकास होणार आहे. तसेच सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन काढावे आणि हे अभियान मुंबई पुरते न राहता नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी जावे व गरिबाला घर मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असल्याचे दरेकरांनी सांगितले.
आशिष शेलार आपण मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहात. मुंबईचे अध्यक्ष आहात. तुम्ही पुढाकार घेतलात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून आपलाही आशीर्वाद या स्वयंपुनर्विकासाला लाभला तर मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणसाला चांगले घर मिळू शकते. सर्वार्थाने मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास महत्वाचा आहे. हे अभियान आणखी ताकदीने पुढे जावे यासाठी पालकमंत्री म्हणून आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही दरेकर यांनी यावेळी आ. आशिष शेलार यांना केली.