रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी; रायगड रोपवे करिता सुमारे चार तासांची प्रतीक्षा; वाहन पार्किंगचा बिकट प्रश्न!! 

 

महाड (मिलिंद माने) – सलग सुट्ट्या लागल्याने किल्ले रायगडावर पर्यटक आणि शिवप्रेमिंची गर्दी उसळली आहे. यामुळे रायगड रोपवेला सुमारे चार ते पाच तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. रायगड पायथा येथे वाहनांची पार्किंग करण्यास देखील जागा उरलेली नाही. रायगड रोपवे ते रोपवे फाटा, रोपवे फाटा ते चित्त दरवाजा पर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगात रांगा लागल्या आहेत. यामुळे या परिसरामध्ये वाहन तळाची सुविधा होणे काळाची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

 

महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेले पाचाड परिसराचा सद्या मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने गडावर येतात. यापूर्वी पावसाळ्यात रायगडावर पर्यटक आणि शिवप्रेमी येणे बंद असायचे मात्र आता गडावर पर्यटक पावसाळ्यात देखील दाखल होऊ लागले आहेत.

रायगड पाहण्यास पर्यटकांनी एकच गर्दी केल्यामुळे पाचाड पासून वाहनांच्या रांगा लागल्या असून चित्तदरवाजा येथे वाहने पार्किंग करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड रोपवे ला सुमारे चार तासाची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे चित्त दरवाजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

गेली काही वर्षात याठिकाणी करोडो रुपयांची कामे केली जात असतानाच मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पार्किंग साठी प्राधिकरणाने जागा संपादन करून त्याठिकाणी वाहन तळाची सुविधा उपलब्ध करून देणे आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला दिसून येत नाही.

महाड रायगड मार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी पाचाड रोपवे फाटा ते चित्त दरवाजा इथपर्यंतचा मार्ग अद्याप अरुंद आहे. यामुळे याठिकाणी दुतर्फा वाहन पार्क केल्या जात आहेत. चित्त दरवाजा याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसेस देखील अडकून पडत आहेत. याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना बसत असून अनेकवेळा पायी चालत जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

शासकीय स्तरावर वाहन तळाची सुविधा नसल्याने याठिकाणी खाजगी वाहन तळ सुरू झाले आहेत.

 

शासनाला कोणत्याच प्रकारचा महसूल न देता सुरू करण्यात आलेल्या खाजगी वाहन तळ मालकांकडून वारेमाप पैसे उकळले जात आहेत. यामुळे . छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला पाहण्यासाठी येणारे शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. प्रतिदिन किल्ले रायगडावर शेकडो बसेस आणि छोटी वाहने येत आहेत. ही वाहने पार्क करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

रायगडाचा आणि परिसराचा विकास झपाट्याने होत असला तरी शासनाचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष आहे. याठिकाणी संपादित जागेत किंवा टी पॉईंट जवळ वाहन तळाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. यामुळे पर्यटक आणि शिवभक्तांची गैरसोय होणार नाही – सिराज सय्यद, स्थानिक व्यावसायिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *