काजूपाडा येथील बांधकाम प्रकरणात उघड झाला भ्रष्टाचार;  दोन पालिका कर्मचारी १६ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

मिरा-भाईंदर : मिरा भाईंदर महापालिका प्रभाग ६ मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या विभागातील दोन कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १६,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

अटक झालेल्यांमध्ये राजेश तुकाराम कदम (कारकून) आणि सुहास किणी ( मजूर ) यांचा समावेश असून, संजय भोला साहू या मध्यस्थालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

काशिमिरा येथील काजूपाडा परिसरातील तक्रारदार महिलेचे जुने घर बेकायदेशीर घोषित करून ते न तोडण्याच्या बदल्यात या कर्मचाऱ्यांनी २५,००० रुपयांची लाच मागितली होती. चर्चेनंतर रक्कम १६,००० रुपयांवर ठरवण्यात आली.

 

तक्रारदाराने ACB कडे धाव घेतली. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात ठाणे-घोडबंदर रोडवरील चेना बसस्टॉपजवळ सरकारी वाहनातून दोन्ही कर्मचारी पैसे स्वीकारताना पकडले गेले.

ठाणे ACBचे अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन मोरे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. तिघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत काशीगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रभाग ६ मधील हे उघड होत असलेले प्रकरण पाहता अतिक्रमण विरोधी विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या व प्रभाग क्र.६ च्या सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिकेतील अनेक विभाग सध्या ACBच्या रडारवर असल्याचेही समजते.

प्रभाग ६ मध्ये वाढत चाललेल्या लाचखोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *