मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने भाईंदर पश्चिमेतील मांडली तलावाच्या पुनरुज्जीवन आणि सुशोभिकरणाच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नगरभवन कार्यालयाच्या इमारतीच्या बाजूची संरक्षक भिंत खचून कोसळल्याची घटना घडली आहे. सलग पाच दिवस सुरू असलेल्या खोदकामामुळे ही दुर्घटना घडली असून त्यामुळे नगरभवनच्या आवारातील भाग खचून ढासळला आहे.
गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास मोठा आवाज आल्याने नगरभवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी धावपळ करत बाहेर आले. त्यावेळी संरक्षक भिंत खचली असून, इमारतीच्या आत जाण्याचा पॅसेजचा भागसुद्धा खचल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे पत्रा शेड, झाडे आणि सुरक्षेसाठी उभारलेले लोखंडी कुंपणदेखील कोसळले.
अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि इमारत रिकामी केली. नगरभवन कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तात्पुरते अन्यत्र हलविण्यात आले असून, कार्यालयांची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करण्याबाबत विचार केला जात आहे.
पालिकेच्या शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि सल्लागार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, मांडली तलाव प्रकल्पासाठी अंदाजे २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तलावातील गाळ काढणे, आरसीसी भिंत बांधणे, गार्डन दुरुस्ती, लोखंडी रेलिंग बसविणे आणि नवीन पायऱ्या तयार करणे अशी कामे सुरू आहेत.
सदर घटनेनंतर नगरभवन इमारतीतील संरक्षक भिंतीला मोठे तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष निरीक्षण पथक नेमण्यात येणार असून, आवश्यक त्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या घटनेत मोठा अनर्थ टळला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पालिकेच्या इमारतीचे आणि इतर संरचनांचे मोठे नुकसान झाले आहे.