■ प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारने २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक केल्यानंतर हजारो वाहनचालकांनी या प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, नंबरप्लेट वेळेवर न मिळणे, अपॉइंटमेंट मिळण्यात अडचणी, आणि फिटमेंट सेंटर्समधील समन्वयाचा अभाव या साऱ्यामुळे वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
अपॉइंटमेंट मिळवणेही मोठं आव्हान
मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाहनमालकांना एचएसआरपी फिटमेंटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळवणे हीच एक कठीण प्रक्रिया ठरत आहे. काही जणांना अपॉइंटमेंट मिळाली तरी नंबरप्लेट वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना फिटमेंट सेंटर्सच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
प्लेट्सचा पुरवठा वेळेवर न झाल्याने त्रास
फिटमेंट सेंटर्समधील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “अनेक वेळा कंपनीकडून पाठवलेल्या एचएसआरपी प्लेट्स वेळेवर पोहोचत नाहीत. परिणामी, ग्राहकांना परत पाठवावे लागते.”
उदाहरणार्थ, वाहन क्रमांक UP80 MH AH 1234 किंवा 40BP 4231 यांसारख्या गाड्यांचे फिटमेंट वेळेवर न झाल्याचे दिसून आले आहे. काही वेळा वाहनचालकांनी बुकिंग केल्यानंतरही ७-१० दिवसांनीही त्यांना प्लेट मिळालेली नसते.
वाहनमालकांची गैरसोय आणि मनस्ताप
या सगळ्या गोंधळामुळे हजारो वाहनमालकांची वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून त्यांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“बुकिंग करून १५ दिवस झाले, पण अजूनही प्लेट मिळालेली नाही. फिटमेंट सेंटरमध्ये गेल्यावर ‘उद्या या’ असं सांगितलं जातं. दर वेळी सुट्टी काढून चकरा माराव्या लागत आहेत,” असे एका वाहनधारकाने सांगितले.
कंत्राटदार आणि केंद्रांमधील समन्वयाचा अभाव
या समस्येच्या मुळाशी कंत्राटदार आणि फिटमेंट सेंटर यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या फिटमेंट सेंटर्सना सुरुवातीच्या काळात प्लेट्सचा पुरवठा वेळेवर होत नव्हता, त्यामुळे सेवा पुरवण्यात अडथळे निर्माण झाले.
परिवहन विभागाकडून स्पष्टीकरण
यासंदर्भात परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी माहिती देताना सांगितले की, “सुरुवातीच्या टप्प्यात काही तांत्रिक व पुरवठा साखळीतील अडचणी होत्या. मात्र, आता ज्या ग्राहकांचे नंबरप्लेट बसविणे बाकी होते, त्यांचे फिटमेंट करण्यात आले आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत.”
वाहनचालकांची शासनाकडे मागणी
वाहनमालकांनी शासनाकडे एचएसआरपी प्लेट्सचा पुरवठा नियमित करणे, अपॉइंटमेंट प्रक्रियेतील सुलभता वाढवणे आणि फिटमेंट सेंटर्सची कार्यक्षमता वाढवणे यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.