पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील नारंगी (विरार) ते खारवाडेश्री (सफाळे) येथे प्रवासी जलवाहतुकीसाठी जेटी उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी लागणारी वनविभागाची जागा सागरी मंडळाकडे वर्ग करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जेटी व या जेटीकडील पोहोच रस्त्याच्या कामाच्या उभारणीला चालना मिळणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील नारंगी (विरार) ते खारवाडेश्री (सफाळे) येथे प्रवासी जलवाहतुकीसाठी रो-रो जेटी व तत्सम सुविधा करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. या प्रकल्पाला २६ ऑक्टोबर २०१७ रोजी १२ कोटी ९२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. दातिवरेपासून जलसार व खारमेंद्री गावादरम्यान असणाºया खारवाडेश्री या जेटीपर्यंत जाण्यासाठीचा रस्ता (१५ कोटी रुपये खर्च) पूर्ण झाला आहे. या ठिकाणी जेटी लगत वाहनतळासाठी आठ कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी मान्यता मिळाली आहे. तर खारवाडेश्री येथे जेटी उभारण्यासाठी २३.६८ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला राज्य सरकारने १५ मार्च २०२३ रोजी मंजुरी दिली आहे. मात्र जेटीच्या ठिकाणी संरक्षित वनक्षेत्र व चिखलाच्या ४७९० चौरस मीटर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात होती. त्यामुळे जेटी उभारणीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.
वन विभागाची जागा महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नावावर हस्तांतरित होण्यासाठी तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या खारफुटीचे योग्य संरक्षण व संवर्धन व्हावे या दृष्टीने किनारपट्टी नियमन क्षेत्र प्राधिकरण (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी) यांची ६ एप्रिल २०१७ रोजी परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतर राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने या रो-रो जेटी संदर्भात २ ऑगस्ट २०१७ रोजी मंजुरी दिली. पाठोपाठ वन विभागाने या संदर्भात प्राथमिक अनुमती २२ ऑक्टोबर २०२० रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी तर सर्वोच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२३ रोजी या कामी अनुमती मिळाल्यानंतर वन विभागाची जागा महाराष्ट्र सागरी मंडळ वर्ग करण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने २ जुलै रोजी काढलेल्या आदेशान्वये वन विभागाची पालघर तालुक्यातील जलसार (१६६५ चौरस मीटर) व खारमेंद्री (३१२५ चौरस मीटर) येथील जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतर करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे रो-रो प्रकल्पांतर्गत खारवाडेश्री येथे जेटी व पोहोच रस्त्याच्या उभारणीतील अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत जेटी व पोहोच रस्त्याच्या निर्मितीदरम्यान त्या ठिकाणी असणारी झाडे व खारफुटी कापण्यासाठी केंद्र व उच्च न्यायालयाची परवानगी घेणे तसेच त्या संदर्भात वन विभागाच्या असलेल्या नियमांचे पालन करणे, जागा वर्ग करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकल्पाने वेळ व इंधनाची बचत होणार असून, खारवाडेश्री ते नारंगी हे अंतर ६० किलोमीटरचे असून सर्वसाधारणपणे या कामासाठी दीड तासाचा कालावधी लागत असतो. मात्र हाच प्रवास जलमार्गाने केल्यास दीड किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागणार असून नारंगी-खारवाडेश्री जेटी कार्यरत झाल्यानंतर पालघर वसई तालुक्यातील नागरिकांच्या प्रवास वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या जलमार्गामुळे वसई-विरार ते सफाळा-केळवा परिसरात प्रवास करणे सुलभ होणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल अशी शक्यता आहे. पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून विरार येथून रस्तामार्गे ७० किलोमीटरवर असणारे हे अंतर जलमार्गाने ३० किलोमीटर इतके होईल. वसई तालुक्यातील काम पूर्णत्वास विरारजवळील चिखलडोंगरी (नारंगी) येथे सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून जेटी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जेटीकडून विरार भागात जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर लांबीचा रस्ता उभारणीसाठी ३० कोटी रुपये खर्च करून काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून रो-रो सेवेअंतर्गत वसई तालुक्यातील काम जवळपास पूर्णत्वास आले आहे.