उमरखाडीत ‘चोर गोविंदा’चा जल्लोष; कलाकार व राजकीय मान्यवरांनी रंगवला सोहळा
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवात उमरखाडीत ‘चोर गोविंदा’ची रंगतदार सोहळा रंगला. यंग उमरखाडी क्रिडा मंडळाच्या वतीने तसेच शिवसेना युवासेना मुंबादेवी विधानसभा विभाग संघटक रुपेश पाटील व महिला उपविभाग प्रमुख प्रिया पाटील यांच्या पुरस्कृत या सोहळ्याला चित्रपटसृष्टी व टीव्ही जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
मंचावर अभिनेत्री लिसा सिंग, लावणी नृत्यांगना गौतमी पाटील, शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार, अभिनेत्री प्राप्ती रेडकर, बिग बॉस फेम दादूस चौधरी, सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर आणि गायक परमेश माळी यांनी उपस्थिती लावून ‘चोर गोविंदा’ची धमाल अनुभवली.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची देखील उपस्थिती लक्षणीय होती. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळे, प्रवक्त्या शायना एनसी आणि नगरसेविका वंदना गवळी यांची विशेष उपस्थिती होती. उत्सवाचे सुयोग्य नियोजन पाहून गोविंदा पथकांनी आयोजक रुपेश पाटील यांचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमात गिरगावच्या ‘अखिल मुगभाट सार्वजनिक गोविंदा पथका’ने तब्बल आठ थरांची उंच दहीहंडी फोडत ‘चोर गोविंदा मानाचा चषक’ जिंकला. यावेळी ७० हून अधिक पुरुष व महिला गोविंदा पथकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रत्येक पथकाला आकर्षक ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या लयबद्ध नृत्य आणि मनमोहक भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकली.