मिरा भाईंदर मध्ये चैत्र नवरात्री उत्सवास सुरुवात; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी , सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमानाही प्रतिसाद

 

भाईंदर, प्रतिनिधी – प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने मिरा-भाईंदर येथे चैत्र नवरात्रौत्सव उत्साहात साजरा केला जात असून यंदा चौथे वर्ष आहे.

देवी दुर्गेच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून, देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी होत आहे. यानिमित्त ९ दिवस विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मीरा भाईंदरचा हा चैत्र नवरात्रौत्सव म्हणजे “नवसाला पावणारी देवी” अशी या उत्सवाची प्रसिद्धी झाली आहे.

 

यंदाही मिरा भाईंदर शहरात भव्य-दिव्य चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २९ मार्च पासून सुरुवात झाली असून ७ एप्रिल २०२५ या कालावधीत उत्सव होणार आहे.

 

गेल्या तीन वर्षांपासून आम्ही मिरा भाईंदर शहरात नवरात्र उत्सवाचे आयोजन भव्यदिव्य पध्दतीने करीत आहोत. या उत्सवामुळे सांस्कृतिक वैभवाला मोठ्या प्रमाणात नावलौकिक प्राप्त झाले आहे. आई जगदंबेच्या पाऊलखुणा आपल्या मिरा भाईंदर शहराला लाभो, आपल्या सर्व मिरा भाईंदरकरांना तिची नऊ दिवस सेवा करण्याचे परमभाग्य प्राप्त होवो आणि तिच्याच आशीर्वादाने आपल्या सर्वांचे जिवन कुशल मंगल होवो या धार्मिक भावनेने आपण हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले आणि सलग चौथ्या वर्षी आयोजनाला लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे , असे आयोजक प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

 

यंदाही चैत्र नवरात्रौत्सवात श्री दुर्गा देवीच्या मूर्तीचे जल्लोषात आगमन झाले. ढोल ताशांचा गजर, बँड पथक, लेझीम पथकाचा सहभाग होता. हजारो भक्तांचा सहभाग होता. शेकडो भाविक भक्त भगवे फेटे, भगवे कपडे घालून आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आयोजक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबासह आगमन मिरवणुकीत सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी हळदीकुंकू , मंगळागौर, महिलांचे पारंपरिक नृत्य , सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सोमवारी सायंकाळी राजस्थानी समाज भजन संध्या पार पडली. तर मराठी नाट्य प्रयोग , यासह गुजराती , बंगाली , दक्षिण भारतीय , उत्तर भारतीय यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार ५ एप्रिल रोजी “माता की चौकी” हा कार्यक्रम होणार आहे. ७ एप्रिल रोजी विसर्जन सोहळा होणार आहे.

 

विकासाच्या गंगे सोबतच भक्तीचा जागर देखील आपल्या शहरात व्हावा या उद्देशाने सर्व समाजातील लोकांना एकत्रित सोबत घेऊन आपण इतक्या भव्य प्रमाणावर हा उत्सव साजरा करत आहोत. या उत्सवात संपूर्ण नऊ दिवस-रात्र अखंडपणे नवचंडी यज्ञाहुती व जप सुरु असेल. या व्यतिरिक्त विविध समाजाच्या मान्यवरांना त्यांच्या योगदानाबद्दल समाजगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात येणार आहे. मराठी, राजस्थानी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बंगाली समाजाची कलाकार मंडळी देखील दररोज येथे उपस्थित राहून कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक अविष्कार सादर करणार आहेत. महिलांसाठी देखील विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नऊ दिवस अखंड चालणाऱ्या शक्तीच्या या महापर्वात आपण भक्तिभावाने व श्रद्धेने जगदंबेचा जागर करण्यासाठी घरचा कार्यक्रम समजून सहभागी व्हा असे आपणांस मी आग्रहाचे आमंत्रण करीत आहे असे आवाहन आयोजक प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *