■ प्रतिनिधी, काशिमीरा, ठाणे : मिरा रोड परिसरातील महिलांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास अवघ्या २४ तासांत उलगडत गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांच्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलीस खात्याच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
घटना कशी घडली?
दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी आर. एल. कॉलेजच्या मागे सालासार अवतार बिल्डिंगसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून जात होत्या. याच वेळी, दोन अज्ञात इसम दुचाकीवरून त्यांच्या पाठीमागून आले आणि त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे चार तोळे वजनाची, २,५०,०००/- रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून घेतली. चैन हिसकावून पळून जाताना आरोपींनी फिर्यादीला धक्का दिला, ज्यामुळे त्या जमीनीवर कोसळून त्यांच्या डाव्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची नोंद मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६३/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०९(४) व ३(५) अंतर्गत करण्यात आली.
तपासाची चोख रणनीती
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. पोलीस आयुक्त श्री. मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांच्या हाती सोपवण्यात आली.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले तसेच स्थानिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी निरज रामु राजनट (२५, रा. लक्ष्मी पार्क, मिरारोड पूर्व) आणि सुनिल संजय राज (२२, रा. रामदेव पार्क, मिरारोड पूर्व) या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी सदर गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली.
कोण होते या कामगिरीमागे?
या यशस्वी कारवाईत गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, तसेच सायबर गुन्हे शाखेचे संतोष चव्हाण, पो.हवा. सुधीर खोत, पो.शि. प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे व इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सदर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मिरारोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींचा याआधीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचीही चौकशी सुरु आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सावध राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.