मुंबई (प्रतिनिधी) : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला असून त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी, 7 मे रोजी, देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ल्याच्या तयारीसाठी मॉक ड्रिल (Mock Drill) आयोजित केली जाणार आहे. या सरावाचा उद्देश नागरिकांना हवाई हल्ल्याच्या परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने सजग करणे हा आहे.
सायरनचा आवाज आणि ब्लॅकआऊटचा अनुभव
या मॉक ड्रिलदरम्यान, देशभर सायरन वाजवले जातील. त्याचबरोबर, रात्रीच्या वेळी ब्लॅकआऊट म्हणजेच पूर्ण अंधार करणे, असा आदेश दिला जाईल. शहरांतील सर्व दिवे आणि विद्युत उपकरणे बंद करण्यात येतील. शत्रूला लक्ष्य ओळखता येऊ नये यासाठी अशा प्रकारचा ब्लॅकआऊट केला जातो.
ब्लॅकआऊटदरम्यान नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- सायरन ऐकू आल्यावर लगेच घरातील दिवे, पंखे आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे बंद करा.
- कोणताही प्रकाश दिसू नये याची विशेष काळजी घ्या.
- शांतता राखा, घाबरून न जाता संयम ठेवा.
- घरात सुरक्षित जागेचा शोध घ्या आणि तिथे आश्रय घ्या.
- लहान मुले, वृद्ध यांना सुरक्षित स्थळी हलवा आणि त्यांना धीर द्या.
- आपल्या शेजाऱ्यांची विचारपूस करा आणि त्यांना आवश्यक ती मदत द्या.
- अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवर भर द्या.
- नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा
ही मॉक ड्रिल म्हणजे केवळ एक सराव असला तरी प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत याचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने यामध्ये गांभीर्याने सहभागी होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि सजग राहण्याचे आवाहन केले आहे.