छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा पोलादपूर स्नेहसंमेलनात हृदय सत्कार
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, भाजपचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई- पोलादपूर तालुका समितीच्या वतीने घाटकोपर (पूर्व) येथील झवेरीबेन हॉलमध्ये आयोजित पोलादपूर तालुका स्नेहसंमेलनात छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, भाजपचे गटनेते आणि पोलादपूरचे सुपुत्र आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते हृदय नागरी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, जलतरणपटू संग्राम निकम, डॉ.ओमकार कळंबे, गुहागरचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांचाही गौरव या स्नेह संमेलनात करण्यात आला.
याप्रसंगी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, अरविंदनाथ महाराज, रायगड जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, उद्योजक संजय कदम, शिवराम उतेकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे,कार्यक्रमाचे संयोजक सुभाष पावर, किशोर जाधव, अमोल वानखेडे यांसह मोठ्या संख्येने पोलादपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छावा चित्रपटची निर्मिती करणे सोपे काम नव्हते. यापूर्वी लक्ष्मण उतेकर यांचे अनेक चित्रपट आले-गेले. परंतु छावा चित्रपटातील विषय संवेदनशील होता. या संवेदनशील विषयाला हात घालत छत्रपती संभाजी राजेंचे मोठेपण जगासमोर आणण्याचे काम आपल्या पोलादपूरच्या मातीतील उतेकर यांनी केले आहे. संपूर्ण जगाला लक्ष्मण उतेकर माहित झाले. नावं मिळवणे, कमावणे आणि टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे , असे सांगून प्रविण दरेकर म्हणाले, हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नाही. पोलादपूरच्या विकासाची अभियान सुरु करणारी चळवळ आहे. माझा तालुकाही महाराष्ट्रात संपन्न झाला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करायचे आहे. पोलादपूर तालुक्याचा विकास करण्याचे उतेकर यांचे जे स्वप्न आहे त्याची जबाबदारी मी आणि मंत्री भरत गोगावले स्वीकारतो. सत्कार हा विचारांचा होत असतो. हार तुरे निश्चितच सत्कारमूर्तीला हवेहवेसे वाटतात. परंतु त्या सत्कारमूर्तीचा विचार हा उद्याच्या पिढीला खऱ्या अर्थाने दिशादर्शक असतो. पोलादपूर तालुक्यासाठी सर्वांनी एकत्र झाले पाहिजे. राजकारण, जातीपातीच्या पलीकडे जाऊन पोलादपूर तालुक्याला जे मागासलेपण म्हणून दूषण दिली जातात ती नष्ट करायची आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जिद्धीने पेटून उठा की येणाऱ्या काळात पोलादपूर तालुका मागासलेला नसेल. त्यादिशेने आपण सर्वांनी मिळून काम करूया, अशी हाक दरेकर यांनी दिली.
दरेकर पुढे म्हणाले, भरत गोगावले मंत्री झालेत. मला अभिमान आहे माझ्या तालुक्यातील माणूस मंत्री झाला, त्याचा उपयोग तालुक्याला झाला पाहिजे. मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. मी नेहमीच सांगत असतो पण माझ्या तालुक्यातून एकही माणूस येत नाही, की भाऊ मला काहीतरी उद्योग करायचा आहे मला पैसे उपलब्ध करून द्या. पश्चिम महाराष्ट्रातून अनेकजण कारखाना, मेडिकल कॉलेजसाठी मदत मागतात. महाराष्ट्रभर प्रकल्प, योजनांना मदत करत असतो तेव्हा माझ्या मनात सातत्याने खंत असते की माझ्या तालुक्यातील माणूस पुढे का येत नाही. जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही तोपर्यंत तालुका विकसनशील होणार नाही, याची जाणीव दरेकर यांनी करून दिली.