मुंबई | प्रतिनिधी : सरकारी अनुदान मिळवून देण्याचे गाजर दाखवत धातू उत्पादक कंपनी विक्रीचा बनाव रचून एका व्यावसायिकाची तब्बल ८ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी कथित वादग्रस्त क्रिकेट बुकी मेहुल जैन आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात ७ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा नोंद होऊन १४ दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बहुकोटींच्या फसवणूक प्रकरणात ठाणे येथील कॅप्रो मेटल्स अँड अलॉइज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित दिलीप जैन, कमलेश जैन आणि वर्षा पटवारी यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. डोंगरीतील व्यावसायिक मोहम्मद फारूक शेख यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
एफआयआरनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत आरोपींनी सुनियोजित कट रचत शेख यांना गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढले. कंपनी तोट्यातून बाहेर आली असून ती ८.२५ कोटी रुपयांना विक्रीस असल्याचा दावा करण्यात आला. कंपनी कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर घेतल्यास ८.५० कोटी रुपयांचे सरकारी अनुदान मिळेल, असे खोटे आश्वासन देत विश्वास संपादन करण्यात आला.
या आमिषाला बळी पडून शेख यांनी मध्यस्थच्यामार्फत अनेक टप्प्यांत रोखीने कोट्यवधी रुपये अदा केले. करारांवर सह्या झाल्या, कंपनी सासू व मेहुणीच्या नावावर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र प्रत्यक्षात सर्वच आश्वासने हवेत विरली. शेख यांना संचालकपद देण्यात आले नाही आणि आरोपींनी भेटीगाठी टाळत वेळकाढूपणा सुरू केल्याचा आरोप आहे.
फसवणूक लक्षात येताच शेख यांनी व्यवहार थांबवून रक्कम परत मागितली. मात्र आरोपींनी जीएसटी नोटीसचे कारण पुढे करत पैसे परत देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर दबाव आणण्यासाठी शेख यांच्याविरोधात इतर पोलिस ठाण्यांत प्रत्युत्तर तक्रारी दाखल केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी वैयक्तिक फायद्यासाठी निधीचा अप्रामाणिक गैरवापर केला, करारातील अटी धाब्यावर बसवल्या आणि तक्रारदार व त्याच्या कुटुंबाची फसवणूक केली. मात्र गंभीर गुन्हा दाखल असूनही मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने या प्रकरणाला राजकीय किंवा आर्थिक आशीर्वाद आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास डोंगरी पोलीस करत असून, आरोपींना अटक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.