पत्रकार बिपिन गुप्ता यांच्यावर भाजपची मोठी जबाबदारी; मीरा-भाईंदरचे मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती

मीरा-भाईंदर : भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने मीडिया क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व बिपिन गुप्ता यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ‘टीव्ही ९ महाराष्ट्र’च्या संस्थापक टीमचे सदस्य राहिलेले तसेच विविध वृत्तपत्रात पत्रकारिता केलेले बिपिन गुप्ता यांची मीरा-भाईंदर भाजपाच्या मीडिया प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पक्षाची ध्येयधोरणे, सरकारची जनकल्याणकारी धोरणे आणि विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गुप्ता यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. नियुक्तीपत्र प्रदान करताना मीरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी विश्वास व्यक्त केला की, गुप्ता यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे पक्षाच्या मीडिया सेलला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल.
माध्यम क्षेत्रातील दांडगा अनुभव
बिपिन गुप्ता हे माध्यम क्षेत्रातील परिचित नाव आहे. ‘टीव्ही ९ महाराष्ट्र’सारख्या नामांकित वृत्तवाहिनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पत्रकारिता आणि जनसंपर्क (पीआर) या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवाचा लाभ आगामी काळात भाजपला डिजिटल तसेच पारंपरिक माध्यमांमध्ये अधिक प्रभावीपणे मिळेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आपल्या निवडीबद्दल आभार व्यक्त करताना बिपिन गुप्ता म्हणाले,
“पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरवेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारच्या जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करेन.”
बिपिन गुप्ता यांच्या नियुक्तीमुळे मीरा-भाईंदर भाजपाच्या मीडिया व्यवस्थापनाला नवी धार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *