मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. याला भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जातनिहाय जनगणनेबाबत काँग्रेसने सत्ता असताना काहीच काम केले नाही. ते फक्त मागणी करत राहिले, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथे राज्यासाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आ. दरेकर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना केंद्र सरकारकडून काल जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेण्यात आला. यावरून काँग्रेसने ‘झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये, राहुल गांधी यांनी केंद्राला झुकवले’, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर बोलताना आ. दरेकर यांनी म्हटले कि, झुकायचा प्रश्न नाही निर्णय घेतलाय त्याचे स्वागत करा. देशातील जनतेसाठी झुकायचा प्रश्न नाही, त्यांना देण्याचा प्रश्न आहे. काँग्रेसची ज्यावेळी सत्ता होती त्याकाळात जातनिहाय जनगणनेसाठी काहीच केले नाही. फक्त मागणी करत राहिले, ते पूर्ण करण्याचे काम भाजपा आणि एनडीए सरकारने केले. काँग्रेसला काय पोस्टर लावायचीत ती लावूदे देशातील जनता मात्र या निर्णयाने खुश आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही, असेही दरेकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
भारताची भीती वाटलीच पाहीजे
पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या धमकीवर बोलताना दरेकर म्हणाले कि, पाकिस्तान एका बाजूला घाबरले आहे आणि दुसरीकडे हल्ला करण्याच्या बाता करत आहे. भारताची भीती वाटलीच पाहिजे. आज भारत एक शक्तिशाली देश म्हणून पुढे आला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या आडून भारतावर हल्ले करत असेल तर योग्य उत्तर द्यावे लागेल आणि भारत ते देईल.