लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्रीजिता पुन्हा एकदा लग्न करत आहे. तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी ३० जून २०२३ ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर आठ महिन्यांनी तिने लग्नाचं रिसेप्शन दिलं होतं. आता ती पुन्हा एकदा लग्न करतेय. श्रीजिता पती मायकलशीच बंगाली पद्धतीने पुन्हा लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे, त्यातील तारखेनुसार ती रविवारी (१० नोव्हेंबर रोजी) लग्न करणार आहे. श्रीजिता व मायकल यांचा मेहंदी सोहळा व संगीताचा कार्यक्रम शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर रविवारी (१० नोव्हेंबरला) हळदी, ४ वाजता लग्न आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता त्यांचे रिसेप्शन असेल. श्रिजीताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पत्रिकेचे फोटो शेअर केले होते. श्रीजिता व मायकल २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. त्यानंतर ते प्रेमात पडले होते. मायकलने श्रीजिताला पॅरिसमध्ये प्रपोज केलं होतं. करोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकललं होतं. अखेर २०२३ च्या जून महिन्यात त्यांनी जर्मनीत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. आता हे दोघेही बंगाली पद्धतीने लग्न करणार आहेत.