नालासोपारा, (प्रमोद देठे) – गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव नसून आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरेची जाणीव करून देण्याचे एक प्रभावी माध्यम ठरू शकतो, याचा सुंदर अनुभव दिला आहे नालासोपाऱ्यात राहणाऱ्या कु. भावेश चंद्रकांत जाधव यांनी. भावेश जाधव हे मिरा भाईंदर महापालिकेत ठेका अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या ह्या देखाव्याबाबत सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
त्यांच्या घरी गणपती बाप्पासाठी तयार करण्यात आलेल्या देखाव्यात त्यांनी मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील पौराणिक बाणगंगा तलावाचा इतिहास सादर केला आहे. आधुनिकतेच्या लाटेत हरवलेला हा ऐतिहासिक संदर्भ भावेशने आपल्या देखाव्यातून नव्या पिढीसमोर आणण्याचा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न केला आहे.
भावेश सांगतो की, “श्रीराम सीतेच्या शोधार्थ दक्षिण दिशेकडे जात असताना या ठिकाणी थांबले होते. समुद्राजवळ असूनही गोडं पाणी मिळत नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या धनुष्यावरून एक बाण मारला आणि त्या ठिकाणी गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला. त्याच झऱ्याला ‘बाणगंगा’ म्हणून ओळखले जाते.”
आजही हा तलाव अरबी समुद्राच्या अगदी जवळ असूनही गोड्या पाण्याचा झरा असलेला दुर्मीळ स्रोत म्हणून ओळखला जातो.
“आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि धार्मिक स्थळांचा परिचय लहान वयातच व्हावा, यासाठी हा देखावा तयार केला,” असे भावेश जाधव यांनी सांगितले.
भावेश यांचे हे कार्य केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, संस्कृतीचे जतन आणि इतिहासाची उजळणी करण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरतो.