मिरा भाईंदर , (प्रतिनिधी) : १ मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात नव्या अत्याधुनिक डायलिसिस युनिट चे लोकार्पण महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ.शर्मा (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दीपक खांबित, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद पडवळ,इतर मनपा अधिकारी, रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, ‘मेकिंग द डिफरन्स’ या संस्थेचे दिपक विश्वकर्मा तर पराग पारीख फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसेस (PPFAS) चे शैलेश पांडे आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मेकिंग द डिफरन्स’ या संस्थेच्या आणि PPFAS च्या सहकार्याने इंदिरा गांधी रुग्णालयात ५ नवीन डायलिसिस मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी येथे ८ मशिन्स कार्यरत होत्या. आता नव्याने जोडलेल्या ५ मशिन्समुळे डायलिसिस उपचारक्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, अधिक रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार देणे शक्य होणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी हि आरोग्यसेवा एक मोठा दिलासा ठरणार आहे . या नव्या डायलिसिस युनिटमुळे मिरा भाईंदर शहरातील डायलिसिस रुग्णांना अधिक सुलभ, वेगवान आणि उत्तम उपचार मिळणार आहेत ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही वर्ष नक्कीच वाढतील जे त्यांच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहे अशा भावना यावेळी मा.आयुक्त यांनी व्यक्त केल्या .तसेच मेकिंग द डिफरन्स आणि पराग पारीख फायनान्शिअल ॲडव्हायझरी सर्विसेसचे आभार मानत यापुढे हि अशाप्रकारे मदत करण्याचे आवाहन केले आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे, आणि हे नवीन डायलिसिस युनिट त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.