बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त मिरा-भाईंदरमध्ये समाजसेवेचा महायज्ञ शहरात उभारणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा – मंत्री प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिरा-भाईंदर शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून, लवकरच शहरात बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
२३ जानेवारी २०२६ पासून बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून, या निमित्ताने ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या बाळासाहेबांच्या विचारधारेनुसार मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून महिनाभर विविध सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू नागरिकांना मोफत चष्मे, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर वाटप, नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळावेत यासाठी मोफत दाखले शिबिरे, महिलांसाठी विशेष कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यशाळा, डिजिटल साक्षरता अभियान तसेच शहरभर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. हे सर्व उपक्रम मिरा-भाईंदर शहरातील २४ प्रभागांमध्ये आयोजित केले जाणार आहेत.
दरम्यान, मुंबईतील कुलाबा येथील रिगल सिनेमा परिसरातील पुतळ्याच्या धर्तीवर मिरा-भाईंदर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन परिसरात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी महानगरपालिकेकडे रीतसर निवेदन देण्यात आल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या विचारांमुळेच आम्हाला समाजासाठी काम करण्याची दिशा मिळाली. जन्मशताब्दी वर्षानिमित्त केवळ उत्सव न करता समाजसेवेच्या माध्यमातून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल. मिरा-भाईंदरमध्ये उभारला जाणारा त्यांचा पुतळा हा मराठी स्वाभिमान आणि राष्ट्रवादाची प्रेरणा देणारे ऊर्जास्थान ठरेल.”
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये शिवप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *