मुंबई – कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर आंबिवली स्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीत पोलिसांवर सातत्याने जीवघेणे हल्ले होत असून, सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांना थेट आव्हान दिले जात आहे. या वस्तीतील दहशत कायमची मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केली.
इराणी वस्तीतील वाढते हल्ले
दरेकर यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या काही वर्षांत इराणी वस्तीत पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वस्तीमध्ये आतापर्यंत दहा ते बारा वेळा पोलिसांवर जीवघेणे हल्ले झाले असून, रॉकेल ओतून पोलिसांना जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. गुन्हेगारांना महिलांआडून पळून जाण्यास मदत केली जाते, दगडफेक होते आणि पोलिसांच्या हत्यारांवरही हल्ले केले जातात. अशा परिस्थितीत एकट्या-दुकट्या पोलिसांना या भागात जाणे अशक्य झाले आहे.
दरेकर यांनी २०१३ ते २०२४ या कालावधीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा दाखला सभागृहात दिला. “या राज्यात कायद्यापेक्षा मोठा कोणीही नाही. जर एखादी वस्ती महाराष्ट्र पोलिसांना आणि सरकारला खुलेआम आव्हान देत असेल, तर यासारखी वाईट गोष्ट असू शकत नाही,” असे ते म्हणाले.
सरकारकडून कठोर कारवाईचा इशारा
दरेकर यांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी इराणी वस्तीत लवकरच व्यापक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले जाईल, असे जाहीर केले. त्यांनी सांगितले की, या वस्तीत दीड ते दोन हजार लोक राहत असून, जिथे जिथे गुन्हेगार आहेत, तिथे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली जाईल.
“ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत, तिथे योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अनधिकृत इमारतींची माहिती घेतली जाईल. राज्यात अनेक परदेशी नागरिकांनी गुन्हे केले आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. परदेशी गुन्हेगारांवर बंधने आणण्यासाठी सरकार ठोस भूमिका घेणार आहे,” असे कदम म्हणाले.
भविष्यात कठोर उपाययोजना अपेक्षित
इराणी वस्तीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकही दहशतीत आहेत. या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने आता ठोस कारवाई करून या वस्तीत शांतता प्रस्थापित करावी, अशी नागरिकांचीही मागणी आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे लवकरच या भागात मोठे ऑपरेशन होण्याची शक्यता आहे.