निवडून आल्यावर वनजमिनीवरील पाण्याचा पहिलाच ठराव करणार; प्रकाश दरेकरांवर आशिष शेलारांचा विश्वास
मुंबई : दहिसर परिसरातील झोपडपट्ट्यांना पिण्याचे पाणी, मूलभूत सुविधा आणि आरोग्यसेवांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रकाश दरेकर यांचा विजय निर्णायक ठरेल, असा ठाम विश्वास राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. निवडून आल्यानंतर वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर पहिलाच ठराव प्रकाश दरेकर करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या दहिसर (पूर्व) येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मंत्री शेलार म्हणाले, “मुंबई महापालिकेची निवडणूक नऊ वर्षांनंतर होत आहे. या काळात तुमच्या विभागासाठी कोण लढले, कोण सेवक ठरले, हे मतदारांनी ठरवायचे आहे. केतकीपाडा, वैशालीनगरसारख्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वनखात्याच्या परवानग्यांचा अडसर आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वनजमिनीवरील झोपड्यांना आहे त्या ठिकाणी पुनर्वसनाचा ठराव मंजूर झाला आहे. आता पाण्यासाठीही अडथळे दूर केले जातील.”

वनजमिनीवरील झोपड्यांना पाणीपुरवठ्यासाठी परवानगी देण्यास विलंब झाल्यास ती परवानगी आपोआप मंजूर मानावी, असा ठराव करण्याचा निर्धार प्रकाश दरेकर करतील, असेही शेलार यांनी सांगितले. विरोधकांनी झोपडपट्टीवासीयांसाठी काय काम केले, याचा एक तरी दाखला द्यावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, “मुंबईचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना अजूनही पाणी व इतर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. पुढील पाच वर्षांत वनजमिनीवरील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा निर्धार आहे.” प्रकाश दरेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३ चा सर्वांगीण विकास करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री शेलार यांनी कोणत्याही अमिषांना व गैरसमजांना बळी न पडता १५ जानेवारी रोजी कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून विकासाला साथ द्यावी, असे आवाहन मतदारांना केले.