मिरा रोडचा महाराजा गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम, सामाजिक बांधिलकीचा आदर्श!

मिरा रोड | प्रतिनिधी : मिरारोडमधील ‘मिरा रोडचा महाराजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आपल्या ३५व्या वर्षात प्रवेश करताना समाजप्रबोधनाचे ध्येय कायम राखले आहे. सन १९९१ पासून कार्यरत असलेले हे मंडळ केवळ धार्मिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, दरवर्षी जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करत समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकत असते.

मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सेल्फ डिफेन्स, महिला सुरक्षा, दामिनी पथकाची कार्यपद्धती, रोबोटिक्स यांसारख्या विषयांवर माहितीपूर्ण कार्यक्रम राबवले गेले आहेत.

यावर्षीही मंडळाने महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमांना मिरा-भाईंदर पोलिस उपायुक्त (झोन-१) राहुल चव्हाण, सायबर सेलचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, अमली पदार्थ विरोधी सेलचे संतोष घाडगे, भरोसा सेलच्या सौ. संध्या पवार, तसेच एचसीजी कॅन्सर रुग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. यश माथूर यांची

उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमांतर्गत “Say No To Drugs” – अमली पदार्थांचे दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाय

“AI vs Cyber Crime” – कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर गुन्ह्यांचा उदय

POCSO कायदा – बालकांविरोधातील गुन्ह्यांविषयी कायदेशीर माहिती

कॅन्सरविषयी आरोग्य जनजागृती – लवकर निदान व प्रतिबंध बाबत जनजागृती करण्यात आली

मंडळाचे पदाधिकारी मितेश चलमेला आणि संकेत मोहिते यांनी सांगितले की, “गणेशोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर समाजप्रबोधनाची संधी आहे. आमच्या मंडळाचा उद्देश प्रत्येक वर्षी समाजाला दिशा देणारा सकारात्मक संदेश देणे हा आहे.”

‘मिरा रोडचा महाराजा’ मंडळाचा हा उपक्रम सणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श ठरत असून, नागरिकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *