मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती

 

मुंबई | प्रतिनिधी : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेत अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ही घोषणा करत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मुंबईत अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर झाल्यानंतर काही दिवसांतच ही नेमणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे यामागे आगामी निवडणुकांची रणनीती असल्याचे स्पष्ट होत आहे.
अमित साटम हे ४९ वर्षांचे, तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले नेते असून, त्यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. मुंबईतील नागरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे, तसेच मुंबई महापालिकेच्या कार्यशैलीवर सातत्याने आवाज उठवणारे साटम, भाजपमधील एक अभ्यासू आणि लढवय्या चेहरा म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या पुढाकारामुळे अंधेरीतील गोखले पुलाचे पुनर्बांधणी काम यशस्वीरित्या पूर्ण झाले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा “काम करणारा आमदार” अशी तयार झाली आहे.
मागील काही वर्षांपासून मुंबई भाजपचे अध्यक्ष राहिलेले आशिष शेलार यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत साटम यांचे अभिनंदन केले.
“साटम हे कोकणच्या मुळाशी आणि मुंबईच्या नाडीशी जोडलेले समर्पित कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सेवेची ही दखल पक्षाने घेतली आहे,” असे शेलार यांनी नमूद केले.
त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षीय कार्यकाळात मिळालेल्या अनुभवासाठी पक्ष, सहकारी आणि मुंबईकरांचे आभार मानले. “या नऊ वर्षांच्या प्रवासाने मला ऊर्जा, नवी ओळख आणि जीवनात दिशा दिली,” असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलार यांच्या नेतृत्वाचा गौरव करत २०१७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीतील यशाचे श्रेय त्यांना दिले.
“शेलार यांनी पक्षाला शहरात अग्रक्रमाचा स्थान मिळवून दिले,” असे सांगतानाच, साटम यांच्या नव्या जबाबदारीबाबतही त्यांनी आशा व्यक्त केली.
“साटम हे अनुभवी, कल्पक आणि आक्रमक नेतृत्व असलेले नेते आहेत. त्यांनी तीन वेळा आमदार म्हणून काम केले असून, संघटनात्मक जबाबदाऱ्या ही उत्कृष्टपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपची गती कायम राहील आणि महायुतीला सत्ता पुन्हा मिळवून देण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे फडणवीस म्हणाले.मुंबईतील आगामी राजकीय घडामोडी आणि मुंबई महापालिका निवडणुकीची दिशा ठरवण्यात ही नियुक्ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *