पुणे | देहू – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानाच्या दर्शनासाठी भेट दिली. त्यांनी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, श्रीराम मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात विधिवत दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या सोबत आमदार सुनील शेळके, संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, तसेच ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दर्शनानंतर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, देहू परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानोबा माऊली”, “माऊली माऊली”च्या जयघोषात आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात दिंड्या-पताका घेतलेल्या वारकऱ्यांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. याच वातावरणात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा लवकरच पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
या भक्तिपूर्ण भेटीने आणि वातावरणाने उपस्थित वारकरी आणि नागरिकांमध्ये नवीन ऊर्जा आणि श्रद्धा निर्माण झाली.