शेती महामंडळाच्या जमिनींची अद्ययावत माहितीसाठी जिओ टॅगिंग करावे- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शेती महामंडळाच्या जमिनींची अद्ययावत माहितीसाठी जिओ टॅगिंग करावे- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे,दि.१०:- शेती महामंडळाच्या जमिनीची व संयुक्त शेती क्षेत्राची सद्यस्थिती व अद्ययावत माहिती महामंडळाकडे असावी यासाठी या जमिनीचे जिओ टॅगिंग करण्यात यावे व या कामाला प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विधान भवन येथे आयोजित बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आ. योगेश टिळेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर तावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवले यावेळी उपस्थित होते.

 

श्री.बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या विविध जिल्ह्यांमध्ये जमिनी आहेत. या जमिनीची सद्यस्थितीचा आढावा घेता यावा, जमिनीवर झालेले अतिक्रमण याची अचूक माहिती प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. यासाठी महामंडळाच्या जमिनींचे जिओ टॅगिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या जमिनींचे जिओ टॅगिंग करण्यास प्राधान्य द्यावे.

शेती महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.तावडे यांनी बैठकीमध्ये महामंडळाच्या जमिनींची माहिती सादर केली. महामंडळाच्या ताब्यात एकूण ८५ हजार ५७३ एकर जमीन आहे. शेती महामंडळाकडे वर्ग झालेल्या जमिनीमधून आवश्यकतेनुसार विविध सार्वजनिक प्रयोजनांसाठी जमीन देण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *