मीरा भाईंदर शहरातील महापुरुष, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरातील अवैध फेरीवाले, अस्वच्छता आणि नो-पार्किंग झोनमधील बेदरकार वाहन पार्किंग या गंभीर समस्यांकडे महानगरपालिका प्रशासन कायम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंदे यांनी पुन्हा एकदा केला आहे.
यापूर्वीही त्यांनी महापुरुषांच्या स्मारकांच्या संरक्षणासाठी भिकमागो आंदोलन’ केले होते व निषेधार्थ आयुक्तांना प्रतिकात्मक 280 रुपये मनी ट्रान्सफर पाठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने उमेश शिंदे यांनी या वेळी अधिक तीव्र भूमिका घेत 6 डिसेंबरपर्यंत स्पष्ट व ठोस कारवाईची मागणी केली आहे.
शहरातील आंबेडकरी व सर्व समाजातील नागरिकांसाठी महापुरुषांचे स्मारक हे श्रद्धास्थान असून तेथे सुशोभीकरणासाठी केलेल्या खर्चानंतरही फेरीवाले, अनधिकृत पार्किंग व कचरा ही स्थिती अपरिवर्तित आहे.
उमेश शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “या वेळीही प्रशासनाने दुर्लक्ष केले तर यापेक्षाही तीव्र व निर्णायक आंदोलन उभारले जाईल.”
आता 6 डिसेंबरपर्यंत महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण मीरा भाईंदर शहराचे लक्ष लागले आहे.