मीरा-भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि. १३) महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी मतदान केंद्रांची व्यवस्था, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, मतदान केंद्राबाहेर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक, कर्मचारी नियुक्ती आदी बाबींचा आढावा देण्यात आला. तसेच मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी QR कोड व गुगल मॅप लिंकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मतदान केंद्रांवर अग्निशमन विभागामार्फत आवश्यक सुरक्षात्मक सुविधा पुरविण्यात आल्या असून, व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून ‘वोटर हेल्प डेस्क’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यासोबतच माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ व सर्वसमावेशक व्हावी, यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून नागरिकांनी गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी केले