मुंबई – मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी व्यक्तींसोबत महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ,अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल,अशी ग्वाहीही श्री.चव्हाण यांनी दिली
श्री. चव्हाण यांनी सांगितले की , कुंडमळा नदीवरील जोडरस्त्यासह नवीन पूलाच्या बांधकामासाठी जुलै, २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ८ कोटी रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर २०२४ विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. दरम्यानच्या काळात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता व पूलाचे डिझाईन अंतिम करण्यात आले. मावळ तालुक्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर शेतकरी व लोकहितासाठी आपण तात्काळ ८ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या नवीन पूलास प्रशासकीय मंजूरी दिल्याचे पत्र ११ जुलै, २०२४ रोजी दिले होते. बांधकाम विभागातर्फे या पुलाच्या दुरुस्तीचा कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, एका वर्षात काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या असे असताना पुढील प्रक्रियेला हेतुपूर्वक विलंब लावला गेला असेल तर त्याची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाईही होईल, असेही श्री.चव्हाण यांनी नमूद केले .