काशिमीरा : दारू पिऊन वाहन चालविणे (Drunk and Drive) हा गंभीर गुन्हा असून अशा निष्काळजी कृत्यांमुळे अपघात होऊन जिवितहानी होण्याचा धोका संभवतो. यास आळा बसविण्यासाठी काशिमीरा पोलीस ठाण्याच्या वतीने जुलै व ऑगस्ट २०२५ महिन्यांदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार ३९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच, निर्धारित वेळेनंतर रात्री आस्थापना चालू ठेवणाऱ्या ७३ आस्थापनांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(डब्ल्यू) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी, सदर प्रकरणांची सुनावणी लोकअदालतमध्ये मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मिरा-भाईंदर न्यायालयात घेण्यात आली. यामध्ये
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांकडून रु.२,५२,८००/-,
लेट नाईट आस्थापना चालवणाऱ्यांकडून रु.३८,५००/-
असा एकूण रु.२,९१,३००/- इतका दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई राहुल चव्हाण, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-०१), मिरारोड,गणपत पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड
आणि राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमीरा पोलीस ठाणे
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
काशिमीरा पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दारू पिऊन किंवा नशेत वाहन चालविणे टाळावे, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतःबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखावी. भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.