नागपूर – गेल्या ३० वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे रखडले आहे. शासनाने हा प्रकल्प ताब्यात घेऊन राबवावा या मागणीसाठी युवा संघर्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. याची दखल घेत गेल्या आठवड्यात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली व तुमचा पुनर्वसनाचा विषय अधिवेशनात मांडून न्याय मिळवून देईन, असे आश्वस्त केले होते. त्यानुसार आ. दरेकर यांनी जिजामाता नगरचा रखडलेला पुनर्विकास तात्काळ सुरु करण्यासाठी शासनाने कारवाई करावी, अशी विनंती केली. दरेकर यांच्या विनंतीला शासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनवर बोलताना आ. दरेकर सभागृहात म्हणाले कि, मुंबईतील काळाचौकी परिसरात जिजामाता नगर आहे. या ठिकाणी जवळपास तीन हजार घरे असून १५ ते २० हजार लोकं राहताहेत. गेली ३० वर्ष त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. अनेक बिल्डर नेमले गेले परंतु त्यांनी पुनर्विकास केला नाही. तीन वेळा तेथील तरुणांनी उपोषणे केली. गेल्या आठवड्यात निलेश गुरव आणि किरण निकम यांच्या युवा संघर्ष संघटनेने ३० वर्ष रखडलेला पुनर्विकास सुरु करावा आणि विकासक नेमला जावा यासाठी उपोषण केले होते. तेथील जनता उपोषणकर्त्यांच्या बाजूने असून जिजामाता नगरचा रखडलेला पुनर्विकास सभासदांच्या मर्जीने होऊन तो तात्काळ सुरु करण्यासाठी शासनाने कारवाई करावी, अशी विनंती केली. दरेकर यांच्या विनंतीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हो असे सकारात्मक उत्तर दिले.