मीरा भाईंदर – सार्वजनिक शौचालयांना पाणी पुरवठा न केल्याने नागरिकांची होणारी गैरसोय याला जबाबदार ठेकेदारावर महापालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणीचे मीरा भाईंदर भाजप (१४५ ) विधानसभा निवडणूक प्रभारी ॲड. रवी व्यास यांनी महापालिका आयुक्त राधाविनोद शर्मा यांना लेखी तक्रार पत्रही दिले आहे. ॲड. रवी व्यास यांच्या पत्रात गणेश देवल नगर, जय अंबे नगर १ आणि २, नेहरू नगर, शास्त्री नगर, भोला नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर, भाईंदरच्या प्रभाग क्रमांक१ मधील मुर्धा खडी या झोपडपट्टी भागातील महिलांकडून आलेल्या तक्रारींनुसार, स्वच्छतागृहात काम करणारे कर्मचारी सकाळी कंत्राटावर पाणी देण्यास नकार देतात. त्यामुळे महिलांना घरातून बादलीभर पाणी घेऊन जावे लागते, जे अपमानास्पद आणि न्यूनगंडाची भावना निर्माण करणारे आहे. कंत्राटदाराला दिलेल्या ठेक्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची जबाबदारी पूर्णपणे ठेकेदाराची असतानाही ठेकेदार नियमांचे पालन करत नसल्याने हजारो नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहे. ठेकेदाराच्या या अमानुष व बेफिकीर वृत्तीवर महापालिका आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी आणि मनपाच्या सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करावी जेणेकरून नागरिकांना या समस्येपासून दिलासा मिळेल, अशी मागणी ॲड. रवी व्यास यांनी केली आहे. विशेष म्हणजे नुकतेच काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या एका उपकंत्राटदाराने बांधकामाचे बिल न दिल्याने स्वत:हून नवीन शौचालय पाडले होते, त्यामुळे प्रशासनावर जोरदार टीका झाली होती.
लोकसंख्येनुसार संपूर्ण देशात स्वच्छतेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या महापालिकेच्या अशा कृत्यांमुळे लौकिकाला तडा जात असून, अशा गंभीर तक्रारींवर महापालिका आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल असे ॲड. रवी व्यास यांनी सांगितले.