मिरा रोड (प्रतिनिधी) : मीरा रोड येथे डोक्यात गोळी झाडून खून करून फरार झालेल्या आरोपीला अखेर पंजाबमधून अटक करण्यात खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.
दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी रात्री 9.15 वाजता, इब्राहीम शेख, उमर रमजान सोलंकी व मोहम्मद शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनू हे गप्पा मारत असताना, सचिनकुमार साहू ऊर्फ राठोड याने घटनास्थळी येऊन सोनूच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला व तिथून फरार झाला होता.
तपासादरम्यान, मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम यांच्याशी मिरा रोड परिसरातील व्यवसायिक वादातून झालेल्या वादामुळे, शैफअली मन्सुरअली खान, मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम, व तब्बसुन परविन मोहम्मद इस्तेकार यांच्या सांगण्यावरून आरोपी सचिनकुमार साहू याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि बंडोलॉज अधिनियमांतर्गत गुन्हा क्रमांक 06/2025 नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा मुख्य आरोपी सचिनकुमार साहू गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खंडणी विरोधी पथकाने आरोपीचा शोध घेण्याची जबाबदारी घेतली. प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या नेतृत्वाखाली सपोनि विजयेंद्र आंबवडे, सफौ शकील पठाण, व पोहवा राजवीर संधु यांच्या तपास पथकाने आरोपीविरोधात तांत्रिक विश्लेषण करुन तपासाची दिशा निश्चित केली.
तपासादरम्यान आरोपी पंजाब राज्यातील भटिंडा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पंजाब गाठून, स्थानिक पोलिसांच्या मदतीने तलवंडी साबो येथे आरोपीला शोधून काढले. त्यानंतर त्यास प्रथमवर्ग न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेत, गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईसाठी मा. पोलीस आयुक्त श्री. मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीत खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
ही कामगिरी पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याचे व चिकाटीचे उदाहरण ठरली असून आरोपीला अटक करून न्यायसमोर आणण्यात पोलिसांना यश आले आहे.