मुंबई – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या भव्य यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा पदयात्रा पार पडली. यावेळी समारोपीय भाषणात उपस्थित समुदायला मार्गदर्शन करताना आ. दरेकर यांनी ‘अभी तो झाकी है हिंदुस्थान की ताकद देखना पाकिस्तान और दुनिया बाकी है’, असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी माजी निवृत्त सैनिक रमेश चंद्रा, विजयप्रताप सिंग, नरेंद्र कुमार, मंगेश कदम, माजी आ. रमेश सिंग ठाकूर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ निशा परुळेकर, मंडळ अध्यक्ष अविनाश राय, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिरवडकर, अमित उतेकर, मंडळ अध्यक्षा सोनाली नखुरे, मंडळ महामंत्री ललित शुक्ला, कृष्णा दरेकर, माजी नगरसेविका प्रीतम पंडागळे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते व सैनिकांप्रती निष्ठा असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरंगा यात्रेच्या समारोपीय भाषणात बोलताना दरेकर म्हणाले की, पहलगाम येथे आपल्या माता भगिनींचे सिंदूर पुसले गेले त्यावेळी देशात संतापाची लाट निर्माण झाली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की तुमच्या अपेक्षेपेक्षाही मोठी शिक्षा पाकिस्तानला देणार. ऑपरेशन सिंदूर झाल्यावर दहशतवाद्यांचे अड्डे कसे उध्वस्त केले हे सगळ्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे प्रचंड असा आत्मविश्वास देशवासियांच्या मनात आहे. पंतप्रधान मोदींच्या हाती देश सुरक्षित आहे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी कसाबने ज्या ट्रेनिंग सेंटर मधून प्रशिक्षण घेतले तो अड्डाही उध्वस्त करण्याचे काम आपल्या सैन्याने केलेय. याचा आम्हाला गर्व आहे. आज संपूर्ण जग पाहतेय भारताची शक्ती काय आहे. चीनही पडद्याआडून पाकिस्तानला पाठींबा द्यायचा प्रयत्न करत आहे. चीननेही लक्षात ठेवावे आता फक्त मिसाईल गेलेय जेव्हा भारताचे बॉम्ब पडतील तेव्हा चीनही राहणार नाही. हा नवीन भारत आहे. तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर तुमच्यावर बॉम्बचा वर्षाव केला जाईल, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील लोकांचेही मी आभार मानतो. विरोधकांचे आणि आमचे राजकीय मतभेद असतील पण ते बोलले आम्ही सरकार आणि लष्करासोबत आहोत. हा आपला भारत आहे. सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली होतेय. आज मुंबईत आपण दहिसर येथून तिरंगा रॅलीला सुरुवात केली. आपल्याला देशाप्रती प्रेम असल्याने अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही पाया खालची जमीन सरकलीय. आपल्या अमेरिकेचे काय होईल ही भीती त्यांना सतावू लागलीय. त्यांना कल्पना नाही भारताच्या सैन्या जवळ कोणकोणत्या मशनरी आहेत. हा आपला भारत आहे. आपल्या देशाप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी, सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी जात,पात विसरून सर्व पक्षीय लोकं सैनिकांच्या सन्मानासाठी रस्त्यावर, मैदानात उतरलेत. ही भारताची ताकद असल्याचेही दरेकर म्हणाले.
तसेच मुंबई दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे त्रासली होती. तेव्हा सरकार वेगळे होते आता सरकार वेगळे आहे. गरज पडल्यास अणूबॉम्बने उडवण्याची ताकद आपल्या सैन्यात आहे. आज आपल्याला सैनिकांच्या शौर्याचे महत्व समजतेय. जे लष्करात काम करतात ते तळहातावर जीव घेऊन दुश्मनांविरुद्ध लढताहेत. ही ताकद अबाधित ठेवण्यासाठी मोदी सरकारला आशीर्वाद देण्याची गरज आहे. पाकिस्तानची स्थिती हातात कटोरा घेऊन भीक मागण्याची आहे. खाण्याचे वांदे असलेल्या पाकिस्तानचा रुबाब मोठा आहे. मात्र त्यांना माहिती नाही आपल्याकडे मोदी आहेत. तुम्ही आमच्या एका माणसाला खरचटवलात तर तुमचे १०० जण मारले जातील. ‘अभी तो झाकी है हिंदुस्थान की ताकद देखना पाकिस्तान और दुनिया बाकी है’. आगामी काळात ही ताकद दिसून येईल, असेही दरेकर म्हणाले.
यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व कार्यकर्ते बाईक रॅलीत सहभागी झाल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आभार व्यक करण्यात आले.