स्वयंपुनर्विकासा संदर्भात आ. दरेकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट

मुंबई – मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी भाजपचे विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीनंतर मुंबईतील स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना मोठा आधार मिळणार असून, निधी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

या बैठकीत नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनसीडीसी) मार्फत गृहनिर्माण प्रकल्पांना निधी देण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे एनसीडीसीच्या ‘अर्बन हौसिंग’ या कर्ज मंजुरी पत्रातील अट वगळण्याची विनंतीही दरेकर यांनी केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर लवकरच दिल्लीमध्ये विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

दरेकर म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः या योजनांचे महत्त्व अमित शहा यांना सविस्तर समजावून सांगितले. त्यांना संपूर्ण प्रस्ताव पटला असून त्यांनी त्वरित कार्यवाहीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाला आता गती मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.”

मुंबईसारख्या शहरात अनेक वर्षांपासून अडकलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास आणि जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे हजारो रहिवाशांना नव्या घराचा रस्ता मोकळा होणार आहे. याशिवाय सहकार क्षेत्रातून अर्थसहाय्य मिळाल्यास, या प्रकल्पांना स्थिरता आणि वेग मिळणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात गृहनिर्माणाच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वासही या बैठकीनंतर व्यक्त केला जात आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे मुंबईतील हजारो रहिवाशांसाठी घराचे स्वप्न साकार होण्याची शक्यता वाढली असून, राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर अडकलेले प्रकल्प मार्गी लागण्याची नांदी झाल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *