गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र आणि त्या अंतर्गत येत असलेल्या सातही विधानसभा मतदारसंघांवर आपलेच वर्चस्व राहावे, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी पटोलेंवर मात केली आहे. विधानसभेच्या सातपैकी सहा जागा जिंकून पटेल यांना वर्चस्व गाजवता आले. यात त्यांना भाजपची मोलाची साथ मिळाली.साकोली मतदारसंघात पटोलेंवर पराभवाची नामुष्की जवळजवळ ओढवलीच होती, पण थोडक्यात हुकली. पटोलेंना काठावर विजय मिळाला. हाच काय तो पटोलेंना दिलासा.
सुमारे १६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या वर्चस्वाच्या लढ्यात २००९ च्या गोंदिया-भंडारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेले पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या पटोलेंचा पराभव केला होता. तो पराभव पटोलेंच्या चांगलाच जिव्हारी लागला. पुढील २०१४ च्या निवडणुकीत पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविली आणि मोदी लाटेत स्वार होऊन त्यांनी पटेल यांचा पराभव केला. मात्र, पटोले जास्त दिवस भाजपत रमले नाहीत. त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पटेल यांच्याशी हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांना निवडून आणले होते. या काही दिवसांच्या भाऊबंदकीनंतर पटोले आणि पटेल यांच्यातील राजकीय वैमनस्य पुन्हा वाढले. २०१९ च्या गोंदिया-भंडारा लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी काँग्रेस पक्षाकडून मदत न केल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा पराभव झाला, असे खापर पटेल यांनी फोडले. तेथून या दोघांतील संघर्ष आणखी चिघळला. त्यानंतर दोघांत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले.
हे ही वाचा… सांगली जिल्हा बॅकेंचे चार संचालक विधानसभेत पराभूत
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पटोलेंनी बाजी मारली. येथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. याचबरोबर राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे पटोलेंचे राजकीय वजनही वाढले. मात्र, पटोलेंना हे वर्चस्व कायम राखण्यात पुन्हा अपयश आले. विधानसभा निवडणुकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी सहा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. या माध्यमातून पटेल यांनी पटोलेंवर मात केली. खासदार पटेल यांनी यंदाच्या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दोन्ही जिल्ह्यांतील सातही मतदारसंघात पटेल यांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिले. याचेच फळ पटेल यांना मिळाले. दुसरीकडे, पटोलेंना अतिआत्मविश्वास नडला. आता गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत आपले वर्चस्व पुनर्प्रस्थापित करण्यात पटोले यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवाय, दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष आता कोणते वळण घेणार, याबाबतही उत्सुकता आहे.