“देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला बहुमत मिळवून दिलं, त्यांना काही लोक टार्गेट..”; छगन भुजबळांंचा अंगुलीनिर्देश कुणाकडे?

Spread the love

Chhagan Bhujbal महाराष्ट्रात महायुतीला महाप्रचंड असं यश मिळालं आहे. २८८ जागांपैकी २३९ जागा या महायुतीला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा बाजू घेतली आहे. भाजपाचा मुख्यमंत्री होणार यात काही गैर नाही कारण त्यांच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
एकनाथ शिंदेंनी जाहीर केला महत्त्वाचा निर्णय
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्य़मंत्रिपदावरुन रेस असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोन दिवस एकनाथ शिंदेंनी बाळगलेलं सूचक मौन हेदेखील त्यामागचं एक कारण ठरलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सांगितलं. तसंच मुख्यमंत्री म्हणून जे नाव जाहीर होईल त्याला पाठिंबा असेल असंही जाहीर केलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी माघार घेतल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याचं म्हटलं आहे.ईव्हीएम मशीनवर तुम्ही संशय घेत आहात. मला एक सांगा मला २०१९ मध्ये ५६ ते ५७ हजारांवर गेलं होतं ते कमी होऊन २६ किंवा २७ हजारांवर आलं. मनोज जरांगे वगैरे मंडळी माझ्या मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री दोन पर्यंत फिरत होती. जर ईव्हीएमचा घोळ असता तर माझं मताधिक्य एक लाखाच्या पुढे गेलं असतं असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.
महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेहनत घेतली-भुजबळ
१३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन असं सांगितलं होतं. पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाही. मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं. शक्ती मागे उभं केली आहे. त्यामुळे त्यांना काही लोक टार्गेट करत आहेत. याचं कारण तेच आहे असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.तर अजित पवार यांनी ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल असं म्हटलं आहे.महायुतीतले प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी माध्यमांना हे सांगितलं की ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर या दोन दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला नव्या सरकारमध्ये असेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *