बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव करत मोठा विक्रम रचला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम केला. त्याचबरोबर या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये चांगलीच खळबळ आहे. पर्थ हा ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला होता, जिथे संघ कसोटीत आजवर कधीच पराभूत झाला नव्हता. पण भारताने हा पराक्रम केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने संघात बदल करत अष्टपैलू खेळाडूला संघात सामील केलं आहे.ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श दुखापतीमुळे त्याच्या जागी नव्या खेळाडूला संघात सामील केलं आहे. त्याच्या जागी कांगारू संघाने अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडूची संघात निवड केली आहे. मार्शच्या जागी ऑस्ट्रेलियन संघाने शेफिल्ड शिल्डमध्ये तस्मानियाकडून खेळणाऱ्या ब्यू वेबस्टरचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश केला आहे. मिचेल मार्शसाठी कव्हर म्हणून ब्यू वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे. ब्यू वेबस्टर याचा प्रथमच आंतरराष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. १ डिसेंबर १९९३ रोजी होबार्ट, तस्मानिया येथे जन्मलेल्या ब्यू वेबस्टरचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. त्याने आतापर्यंत ९३ प्रथम श्रेणी, ५४ लिस्ट ए आणि ८९ टी-२० सामने खेळले आहेत.ब्यू वेबस्टरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७.८३ च्या सरासरीने ५२९७ धावा आणि १४८ विकेट घेतल्या आहेत. यात त्याची १२ शतकं आणि २४ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याच वेळी, लिस्ट ए मध्ये त्याने ३१.३५ च्या सरासरीने १३१७ धावा आणि ४४ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २७.१६ च्या सरासरीने १६३० धावा केल्या आहेत, तर २१ विकेट्स घेतल्या आहेत.भारत ‘अ’ विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील कसोटी सामन्यात त्याच्या अलीकडील चांगल्या कामगिरीमुळे वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला. भारत अ विरुद्धच्या अनधिकृत ‘कसोटी’ मालिकेत, वेबस्टर हा ऑस्ट्रेलिया अ साठी ७२.५० च्या सरासरीने १४५ धावा करणारा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने २० पेक्षा कमी सरासरीने सात विकेट्सही घेतल्या.यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दावा केला होता की यजमान संघ ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीसाठी १३ सदस्यीय संघात कोणताही बदल करणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियाने आता नव्या खेळाडूला संघात संधी दिली आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.