अलिबाग – रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आमदार विजयी झाले आहे. प्रशांत ठाकूर, आणि भरत गोगावले सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. तर आदिती तटकरे दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. या तिघांनाही राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा रायगड जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे.रायगड जिल्ह्यातून भाजपचे तीन, शिवसेना शिंदे गटाचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला रायगडमधून यंदातरी मंत्रीपद मिळावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. गेल्या महायुती सरकारमध्ये रायगड जिल्ह्यातून शिवसेना आणि भाजपच्या एकाही आमदाराची मंत्रीपदावर वर्णी लागली नव्हती. मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. मंत्रीपदाच्या आशेवर असलेले भरत गोगावले हे प्रतिक्षा यादीवरच राहिले होते. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये शिवसेनेकडून आमदार भरत गोगावले, तर भाजपकडून प्रशांत ठाकूर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाकूर पनवेलमधून, तर गोगावले महाड मतदारसंघातून विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले आहेत. तर आदिती तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पुन्हा एकदा मंत्रीमंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
आदिती तटकरे यांच्या मंत्रीमडळातील समावेशाला विरोध
दरम्यान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या मंत्रीमडळातील समावेशाला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. महायुती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार दिला. छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही थोरवे यांनी म्हटले आहे. तर मंत्री कोणी व्हायचे हे पक्षाचे नेते ठरवतात, काठावर पास झालेले आमदार ठरवत नाहीत, असे म्हणत आदिती तटकरे यांनी थोरवे यांना उत्तर दिले आहे.