एकनाथ शिंदे भाजपावर नाराज? गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा, बावनकुळे म्हणाले…

Spread the love

महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, महायुतीत पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपाने स्पष्ट केल्यानंतर शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली. दीपक केसरकर तर थेट म्हणाले की मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आता दिल्लीतून घेतला जाईल. या सर्व घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्यामुळे एकनाथ शिंदे आता भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांनी महायुतीकडे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाऐवजी राज्याचं गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “एकनाथ शिंदे नाराज नाहीत. आम्ही महायुती म्हणून अभेद्य आहोत”. एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपद मागितल्याच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “मला त्याबाबतची माहिती नाही. याबाबतचा निर्णय आमचं केंद्रातलं नेतृत्व घेणार आहे. तसेच राज्यातील हे तिन्ही नेते (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस  अजित पवार) मिळून काम करत आहेत. ते महायुतीचं काम करत आहेत. आता ते मुख्यमंत्रीपद व इतर गोष्टींवर चर्चा करतील. तसेच आमच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाशी बोलतील. त्यानंतरच या सर्व विषयांवर निर्णय घेतले जातील”.

सरकार कधी स्थापन होणार? बावनकुळे म्हणाले…

सरकार कधीपर्यंत स्थापन होईल? त्यासाठी डिसेंबर उजाडण्याची वाट पाहावी लागेल का? असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, मी वारंवार सांगतोय की तीन पक्षांचे मंत्री सरकारमध्ये असणार आहेत. या मंत्र्यांमध्ये खात्यांचं वाटप केलं जाईल. पालकमंत्र्यांना जिल्ह्यंचं वाटप केलं जाईल. या सर्व बाबी ठरवण्यासाठी वेळ लागतो. हे सगळे प्रश्न सोडवल्यानंतरच सरकार बनतं. केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन भागत नाही. इतर गोष्टींचा देखील विचार करावा लागतो. तीन पक्षांना काय मिळणार? मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेटमधील इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी होईल. तुम्ही म्हणताय तसं डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबर, हे काही सांगता येणार नाही. डिसेंबर किंवा नोव्हेंबरचा पॅरामीटर नाही. सध्या महाराष्ट्राला काळजीवाहू मुख्यमंत्री मिळाले आहेत. एकनाथ शिंदे ही जबाबदारी पार पाडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *