“त्याच्या पाणी भरलेल्या डोळ्यांत बघून सांगावं…”, ‘पारू’फेम अभिनेत्रीने वडिलांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा!

Spread the love

‘पारू'(Paaru) मालिकेतील दामिनीचे पात्र हे सर्व मालिकांतील पात्रांहून वेगळे आहे. मालिका सुरू असतानाच हे पात्र प्रेक्षकांशीदेखील बोलत असल्याचे पाहायला मिळते. थोडे नकारात्मक वाटत असलेले हे पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतानासुद्धा दिसते. अभिनेत्री श्रुतकीर्ती सावंत(Shrutkirti Sawant)ने दामिनीची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होताना दिसते. नुकत्याच पार पडलेल्या झी पुरस्कार सोहळ्यात तिला ‘सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर करून, तिच्या भावना व्यक्त केल्या आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री श्रुतकीर्ती लिहिते, “आज जवळजवळ महिना उलटला हे मानांकन मिळून आणि मी आज फोटो शेअर करतेय. कारण- जेव्हा मी हे सन्मानचिन्ह हातात घेतलं, त्या दुसऱ्या क्षणाला वाटून गेलं की आता जावं आणि बाबाच्या हातात देऊन, त्याला घट्ट मिठी मारावी. त्याच्या पाणी भरलेल्या डोळ्यांत बघून सांगावं की, हो हे ‘श्रुतकीर्ती रणजित सावंत’चं आहे. बास, इतकी माफक इच्छा होती. पण, सगळ्या इच्छा पूर्ण थोडी होतात. मग त्या दिवशी ठरवलं की, या वर्षीच्या बाबाच्या वाढदिवसाला हे गिफ्ट द्यायचं. बाबा हॅपी बर्थडे, लव्ह यू खूप. आणि हो कितीही स्ट्रॉंग असले तरी मिस यू. अजून खूप वाढदिवस साजरे करायचेत आपल्याला.” अभिनेत्रीने पुढे लिहिले, “आता या मानांकनाबद्दल बोलते. आणि विजेती आहे दामिनी. हे शब्द कानावर आले आणि पुढचे दोन मिनिट सगळं शांत वाटलं. कुईईई असा आवाज फक्त. दामिनी, तू खूप काही दिलंस गं. तुझ्याशी मैत्री व्हायला तसा फार वेळ लागला नाही. लगेच आपलंसं करून घेतलंस मला.” राजू सावंत यांना टॅग करीत तिने लिहिले, “सर, तुम्ही जी काही दामिनी उभी केलीये समोर ना, ती कल्पनेतसुद्धा आली नव्हती माझ्या. थॅंक्यू यू सो मच! प्रेक्षकांशी संवाद साधायला मिळणं आणि तेही व्यक्तिरेखा म्हणून. ही कोणत्याही लाकारासाठी पर्वणीच म्हणावी लागेल. तुम्ही जो विश्वास दाखवलाय ना. नतमस्तक.” मालिकेतील इतर व्यक्तींना तिने दामिनी इतक्या उत्तमपणे साकारल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर मालिकेतील पारू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणेने कमेंट करीत लिहिले, “सुंदर लिहिलंयस.” तर अनेक नेटकऱ्यांनीदेखील ती साकारत असलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. दरम्यान, पारू या मालिकेत अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनुष्काच्या येण्याने किर्लोस्कर कुटुंबात वाद होताना दिसत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *