तावडे यांची राहुल गांधी, खरगेंना नोटीस; २४ तासांत आरोप मागे घ्या, अन्यथा १०० कोटींचा बदनामीचा दावा

Spread the love

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात बदनामीबद्दल १०० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याची कायदेशीर नोटीस बजावली आहे. विरार येथील विवांता हॉटेलमध्ये तावडे यांच्याकडून कथित पैसेवाटप करण्यात आल्याचे आरोप बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. विनोद तावडे हे १९ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी उमेदवार राजन नाईक यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर हॉटेलमधील खोलीत चर्चा करीत होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले. तावडे यांच्याकडून पैसेवाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष खरगे, राहुल गांधी व श्रीनेत यांनीही त्याआधारे तावडे यांच्याकडून पाच कोटी रुपयांचे वाटप सुरू होते, ही रक्कम कोणी व कशी पाठविली, आदी आरोप प्रसिद्धीमाध्यमे व समाजमाध्यमावरून केली. पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली असताना, आपल्याकडे रोख रक्कम मिळाली नाही आणि पैसेवाटपाच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण तावडे यांनी केले होते. पण तरीही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तावडे यांच्याविषयी आरोप केल्याने आपली व भाजपची बदनामी झाली. हे आरोप मागे घेत असल्याचे २४ तासांमध्ये जाहीर न केल्यास बदनामीबद्दल न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा तावडे यांनी या तीनही नेत्यांना कायदेशीर नोटीस बजावून दिला आहे.

पैसेवाटपप्रकरणी हॉटेल मालकावरही गुन्हा

वसई : नोटावाटप प्रकरणात विवांता हॉटेलच्या चालक-मालक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पैसे वाटप करून मतदारांना लाच देणे, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही ४८ तासात मतदारसंघात बेकायदेशीर प्रवेश करून सभा घेणे, पत्रकार परिषद घेणे तसेच मारहाण करणे याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचाराचा कालावधी संपला असतानाही बेकायदेशीरित्या हॉटेल वापरण्यास दिल्याप्रकरणी हॉटेलचे चालक आणि मालक रत्नाकर महालिंगा शेट्टी, सुरेश महाबळ शेट्टी, ज्योती जाधव, हेमंत जाधव आणि अन्य भागिदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलमध्ये साडेचार तास भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना डांबून ठेवले होते. मात्र या कालावाधीत काहीच कारवाई न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हॉटेलमध्ये सुमारे चारशे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते, तरी पोलिसांना त्याची माहिती का नव्हती, असा प्रश्न विचारला जात आहे. वसई-विरारमधील ३६ जुन्या आणि अनुभवी पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. जर हे अनुभवी पोलीस असते तर हा प्रसंग एवढा वाढला नसता, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *